रवी बापटले यांचे एड्स ग्रस्तांसाठीचे सेवालय

१६. रवी बापटले यांचे एड्स ग्रस्तांसाठीचे 

सेवालय    - कु.श्रद्धा मजगे 

                                                                                                      

 प्रस्तावना 

   सध्याच्या काळात, जो मनुष्य आरामदायक व सुखी जीवन जगण्याची स्वप्ने पाहत असतो. त्याच युगात, स्वतः त्रास व कष्ट सहन करून रवी बापटले सारखे लोक समाजाच्या कल्याणासाठी  काही करू पाहत असतात. रवी बापटले समाजातील गरजू, आजारी व दुर्लक्षित एड्स ग्रस्तांना सेवा देण्याचे कार्य करतात. गरीब, अनाथ व आधार नसलेल्या रुग्णांची काळजी घेऊन त्यांना समाजात वावरताना समान संधी प्राप्त करून देणे व स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांची मदत करतात.

 रवी बापटले यांची जडणघडण          
  रवी बापटले हे मूळचे उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा या गावचे आहेत. त्यांनी पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण  पूर्ण करून लातूर जिल्ह्यात 'दैनिक संचार' या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. २००४ पासून पुढील चार वर्षे महाविद्यालयात पत्रकारितेचे प्राध्यापक म्हणूनही  कार्यरत होते. पत्रकार व प्राध्यापक या दोन्ही नोकऱ्यांमध्ये कार्यरत असूनही त्यांना सामाजिक कार्याची आवड होतीच. म्हणून, त्यांनी गावातील स्वच्छतेचे काम स्वतःच्या हाती घेऊन आपल्या कार्याची सुरुवात केली. यातून त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते.

   रवी बापटले यांचे राहणीमान

                    रवी बापटले यांनी साधे व संयम यावर अधिक भर दिलेले आहे.  अंगावर पांढराशुभ्र खादीचा कमीज, पॅन्ट व डोक्यावर रुमाल अशी त्यांची साधी व नीटनेटकी वेशभूषा आहे. त्यासोबतच, भोजनही अगदी साधे स्वरूपाचे आहे. ते कोणत्याही गोष्टीचा देखावा करीत नाहीत. त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र व शांत पहायला मिळतो. ते इतरांची सेवा करण्यामध्येच आपले समाधान मानतात. 

       कार्यामागील प्रेरणा

      २००७ मध्ये चालू केलेल्या 'स्वच्छता अभियान' मोहिमेच्या वेळी रवी बापटले यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका सात वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. त्या अनाथ मुलाच्या मृत्य देहाला  कुत्र्यांनी फाडून खाल्ले होते. असे हृदयद्रावक चित्र पाहून रवी बापटले यांचे मन अस्वस्थ झाले, तरी त्या मुलाचा अंतिम संस्कार त्यांनी केला व मनाशी ठरवले की, एड्स बाधितांना समाजात न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी मी स्वतः कार्य करणे गरजेचे आहे. तेव्हापासून, रवी बापटले यांनी सर्व एड्स बाधितांसाठी  समाजाच्या विरुद्ध जाऊन अनेक कार्ये केली. तो प्रसंग त्यांच्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देऊन गेला. आज एड्स बाधितांसाठी तो नवजीवनाचा मार्ग ठरलेला दिसून येतो.

एड्स या आजाराविषयी माहिती

   


    ( AIDS - Acquired Immune Deficiency Syndrome ) म्हणजेच 'उपार्जित प्रतिशमता त्रुटीजन्य लक्षणसमूह' होय. हा त्याचा मराठी अर्थ आहे. एड्स हा आजार ( HIV - Human Immunodeficiency Virus ) या विषाणूमुळे होतो. यामुळे शरीराची (CD4) ही पेशी नष्ट होऊन शरीराची रोग प्रतिकारक क्षमता , वजन व स्मरणशक्ती कमी होणे, डोकेदुखी, ताप , झोपेत घाम व अंगावर पुरळ येणे, थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे व घसा खवखवणे ही एड्स या आजाराची लक्षणे आहेत. हा आजार इतर कॅन्सर, सारख्या रोगाप्रमाणेच प्राणघातक व गंभीर आहे. या आजारात ( ART - Antiretroviral Therapy ) हा उपचार न मिळाल्यास  जीवाचाही धोका असतो. हा आजार संसर्गजन्य असल्याचे गैरसमज असल्याने एड्सग्रस्तांना तिरस्काराच्या नजरेने पाहिले जाते. त्यांना समाजापासून दूर ठेवले जाते व कोणत्याही कार्यात भाग घेण्यास मनाई असते. पण, असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित रक्त व आईकडून बाळाला व्हायचा हा आजार आहे, हे सत्य स्वीकारण्यास समाज नाकारत असतो. याच समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी व याचे गांभीर्यत्व लक्षात घेऊन रवी बापटले यांनी एड्सग्रस्तंसाठीचे सेवालय उभे केले.

सेवालयातील आनंदी गाव            


       रवी बापटले यांचे सेवालय Happy Indian Village म्हणून ओळखले जाते. ते या सेवालयाचे स्वतःला सेवक मानून एड्सग्रस्तांची मदत करतात. हे आनंदी गाव लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यामधील हासेगाव येथील माळरानावर २५ एक्कर मध्ये पसरलेले आहे. एड्स ग्रस्तांसाठी येथे औषधोपचार, राहण्यासाठीची घरे, पुनर्वसनाची घरे, जोडप्यांच्या राहण्याची सोय व पोषक आहाराची परिपूर्ण व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या पौष्टिक आहारासाठी हिरव्या पालेभाज्या, विविध फळे व कडधान्य पिकवली जातात. शेतीसाठी बैल, मनोरंजनासाठी घोडे व जीवनसत्त्वयुक्त दुधासाठी गाई व म्हशी पाळल्या जातात. उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून एक तळे, विहीर व बोरवेलही आहे. 

       


एड्सग्रस्तांची परिपूर्ण सोय येथे करण्यात आलेली आहे. अठरा वर्षाखालील मुलांसाठी बालगृहे व १८ वर्षाच्या पुढील मुलांसाठी रोजगाराची व शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते.  ऍड्सग्रस्त ३५ मुला - मुलींची लग्नेही रवी बापटले यांनी येथे लावून दिलेली आहेत. या उजाड माळरानावर रवी बापटले यांनी ८०% जमिनीवरील भागावर फुल - फळ झाडांची बागच फुलवलेली दिसून येते. 'रचना बापटले' या त्यांच्या पुतणी रवी बापटले यांच्या अनुपस्थितीमध्ये सेवालयाचे काम पाहताना दिसून येतील.

सेवाभावीवृत्तीने  इतरांनी केलेली मदत 

     


   प्राध्यापक, विद्यार्थी, एड्सग्रस्त मुले-मुली, रवी बापटले यांच्या सहकार्यांनी व नातेवाईक यांनी आपल्या श्रमातून व आर्थिक निधीतून सेवालयाला मदत केली. त्यातच अनेक अपरिचित व्यक्तींनीही हे सेवालय उभे करण्यासाठी हातभार लावले. उदाहरणार्थ : सुप्रसिद्ध महानायक 'अमिताभ बच्चन' यांनी आपल्या स्वखर्चातून 15 लाख रुपयांची मदत केली. पद्मश्री पुरस्कार प्राप्त गायिका 'अनुराधा ताई पौडवाल' यांनी दिलेल्या निधीतून मुलींचे वस्तीगृह उभे राहिले. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल 'भगत सिंह कोश्यारी' व माननीय न्यायाधीश ॲड. 'दीपक जी बनसुडे' यांनीही आपल्या स्वखर्चातून सेवालयाला मदत पुरवली. 'संजय साई लोकसेवा सेंट्रल ट्रस्ट, मुंबई' या संस्थेनेही मदत केली.

 सेवालयासमोर आलेली आव्हाणे 


                 सामाजिक कार्याच्या सुरुवातीला प्रथमतः म्हणजे  पैसे नव्हते. रवी बापटले यांनी अनुदानाची रक्कम जमा करून हळूहळू पैसे जमवले व ते एड्स बाधित रुग्णांच्या उपचारासाठी वापरू लागले. लाईट नव्हती, तेव्हा जिल्हाधिकाऱ्याकडे विनवणी केली, ते येईपर्यंत सहा महिने बिगर लाईट  एड्स रुग्णांची सेवा केली. जेव्हा, एड्स बाधित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला विरोध झाला. तेव्हा ,रवी बापटले यांच्यावर विविध आरोप लावले गेले. दीड वर्ष शाळा बंद करून त्याच्यावर उपाय शोधण्यात आले. नंतर,एड्स बाधितांसाठी घरे बांधण्यात आली होती, ती गावकऱ्यांनी मिळून उध्वस्त केली. त्यांचा आक्रोश न धरता रवी बापटले यांनी गावकऱ्यांचे विचार बदलण्यासाठी पुढे आपले कार्य दुसरीकडे चालू केले. शहाजी नावाच्या सात वर्षीय या एका मुलापासून सेवालयाची सुरुवात केली. अशा सर्व अडचणींना सामोरे जात, आजचे भव्य सेवालय उभे राहिले.

 रवी बापटले यांना मिळालेले पुरस्कार

       


      रवी बापटले यांच्या समाजकार्याला पाहून अनेक संस्थानी त्यांना पुरस्कार व मानचिन्हे दिली. त्यामध्ये गोविंदभाई श्रॉफ स्मृर्ती पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, कार्यकर्ता पुरस्कार, इत्यादी पुरस्काराने नावाजले गेलेले आहे. 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या  T.V. show वर प्रत्यक्ष रवी बापटले यांना बोलवण्यात आले. अशा अनेक कार्यक्रमात रवी बापटले यांच्या समाजकार्याची दखल घेण्यात आलेली आहे.

  माझे निरीक्षण


           समाजामध्ये रवी बापटले यांसारख्या व्यक्तिमत्त्वाचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या कार्यातून समाजसेवा, शिक्षणाचा प्रसार, समाजातील अंधश्रद्धा दूर करणे व युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे. जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम, संयमी भाव व सेवा वृत्तीतून आपले व्यक्तिमत्व आदर्श निर्माण करणारे असू शकते, हे रवी बापटले यांनी सिद्ध केले. रवी बापटले यांच्यात प्रामाणिकपणा, सभ्यता, मानवतेची भावना व त्याग वृत्ती दिसून येते. रवी बापटले यांनी एड्स बाधितांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून, आजच्या स्पर्धात्मक युगात वावरण्याचे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण केले आहे. समाजातील समस्यांकडे फक्त पाहण्यापेक्षा त्यावर उपाय शोधून प्रत्यक्ष कार्य करणे गरजेचे असते, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून नवयुवकांनी शिकण्याजोगे आहे

 प्रत्येकाने येथे का गेले पाहिजे?

            आजच्या आधुनिक युगात, मुलांनी मोबाईलच्या आभासी  जगात न वावरता प्रत्यक्ष जीवनातील अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवे, त्यासाठी तेथे गेले पाहिजे. प्रत्यक्ष जीवनातील संघर्ष काय असतो त्याचे साक्षीदार म्हणजे तेथील एड्स बाधित मुले व मुली आहेत. रवी बापटले यांच्या सेवालयातील सौंदर्य व मोहकता आपल्यालाही काहीतरी नवे  कार्य करण्याची प्रेरणा देते. रवी बापटले यांची प्रेमळ वृत्ती व एकसंघपणा आपल्याला इतरांवर प्रेम, दया व बंधुभावाने राहण्याची शिकवण देते, ते प्रत्यक्षात रवी बापटले यांच्या सेवालयामध्ये जाऊन आपण अनुभवले पाहिजे. एखादे काम नि:स्वार्थ भावनेतून केले तर, ते किती सौंदर्यात्मक असू शकते, याचे चित्रण सेवालयात दिसून येईल.


                                 -   कु.श्रद्धा वीरभद्र मजगे 

                                        बी.ए.प्रथम वर्ष 
                                        
 २०२५-२०२६ 
           

          


ब्लॉग समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार ९८९००६५६९०

सहसमन्वयक : प्रा.व्ही.जी. बिरादार, प्रा.जे.डी.संपाळे

                                                                          

Comments

  1. प्रेरणादायी ब्लॉग. संवेदनशील मनाने आपण हा लेख लिहिलात. हार्दिक अभिनंदन श्रद्धा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऐतिहासिक खरोसा लेण्या

Lucky : A Special Member of Our Family