माझ्या गावातील तुकोबांची यात्रा

 १३.माझ्या गावातील तुकोबांची  यात्रा

                              निळकंठ सूर्यवंशी  

               माझे गाव हंगरगा (खुर्द) तालुका मुखेड जिल्हा नांदेड. हंगरगा (खुर्द)हे गाव उदगीर शहरापासून ३९ किलोमीटर अंतरावर कर्नाटक  सीमाभागात सलेले एक छोटेसे खेडे/ग्रामीण भाग आहे. या गावची एकूण लोकसंख्या १३३४ असून गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकात्मतेच्या भावनेने राहतात. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या गावची संत तुकोबांची यात्रा होय.

               इ.स.१९९८ पासून दरवर्षीप्रमाणे भरणारी  २७ वर्षाची परंपरा म्हणजे संत तुकाराम महाराज  यात्रा. अखंड हरिनाम सप्ताह यात्रा हंगरगा चौरस्ता (खुर्द) या यात्रेला सुरुवात प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या आठवड्यामध्ये  होते.

यात्रेचा इतिहास

       २०२५ या वर्षांमध्ये ह्या यात्रेला २७ वर्षे पूर्ण होतात.वारकरी संप्रदायामध्ये एकात्मतेची भावना टिकून ठेवण्यासाठी (ह.भ.प.) ( गुंडा महाराज चांदेगावकर) यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार हा अखंड हरिनाम सप्ताह यात्रा हिंदू संस्कृतीचा वारसा म्हणून भक्ती मार्गाने  साजरा केला जातो .

      ह.भ.प गुरुवर्य दादासाहेब महाराज यांच्या पुण्याईने व कृपा आशीर्वादाने या सप्ताह व यात्रेस प्रतिवर्षी मोठ्या थाटामाटाने सुरुवात होते. या यात्राभागातील परिसरातील लोकांचे असे म्हणणे आहे की, कर्नाटकातील हंगरगा गावच्या मारुती सावकार यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष मध्ये देव दिसले आणि चार पावले दूर जाऊ विलुप्त झाले. त्यानंतर तिथे मंदिर बांधण्याचे ठरवण्यात आले. मंदिर बांधणे झाल्यानंतर इथे अखंड हरिनाम सप्ताह यात्रा भरवण्यात येऊ लागले. अशी त्या भागातील गावकऱ्यांची सर्व व्यक्तींची पूर्वीच्या काळातील आख्यायिका आहे.                                       


 संत तुकाराम आणि इतर भाषिक 

         तुकाराम बोल्होबा आंबिले ( मोरे)जगद्गुरु वैकुंठवासी  संत तुकाराम महाराज हे जरी सतराव्या शतकातील  महाराष्ट्रातील देहू या ठिकाणचे रहिवासी  असले तरी ते महाराष्ट्रपुरतेच मर्यादित नसून त अवघ्या राष्ट्राच्या हितासाठीचे अभंग वाणीतुन या भोळ्या समाजाला प्रेरित केले आहेत.'जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.' संत तुकारामांच्या या वचनाप्रमाणे सामान्य माणूस हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.

                   संत तुकाराम महाराज यात्रेत निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात येते की, संत तुकाराम महाराज हे राज्यापुरतेच मर्यादित नसून हे एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महान संत म्हणून त्यांची प्रतिमा आहे. कर्नाटकमध्ये संत तुकाराम महाराजांचे अभंग   भजन केले जाते. तिथे सुद्धा कानडी भाषिक लोक हे आवडीने मराठी भाषेतून सुद्धा अभंग म्हणतात. महाराष्ट्र - कर्नाटक - तेलंगणा - आंध्र प्रदेश एवढेच नव्हे तर संपूर्ण भारत व भारताबाहेर त्यांचे अभंग आहेत. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी मध्ये  बुडाली असे म्हणतात,पण साधू संतांच्या ओठावरील अभंगांच्या सुरामध्ये ते अजून सुद्धा जिवंत आहेत असे दिसून येते. आमच्या यात्रेच्या निमित्ताने तुकाराम महाराजांच्या अभंगाचा जागर घातला जातो.

यात्रेचे स्वरूप

     या ठिकाणी  संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सुंदर मंदिर आहे. संत तुकाराम महाराजांचा गाभाऱ्यामध्ये त्यांच्या मागे असलेली सुंदर विठ्ठल रुक्माईची दगडापासून बनवलेली मूर्ती. त्यांना असलेले रेखीव चित्राकृती मंदिराच्या समोरच असलेले गरुड मंदिर आणि हनुमान मंदिर आणि तुलसी वृंदावन हे शोभनीय आहे.

         


  यात्रेला सुरुवात होत असताना पाच गावचे भक्त जनसमुदाय त्या ठिकाणी दिंड्या पालख्या, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहाने नाचत गाजत येत असतात. जवळपास दोन एकर मंदिर परिसरामधे मंडप सजावट केली जाते. त्यानंतर येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा केली जाते. यांचे जेवणाच्या सोयी सुविधा केलेला आहे. बाहेरून गावी येणाऱ्या गायक, वादक, प्रवचनकार व कीर्तनकार यांची सुद्धा सोयी सुविधा लक्षात घेतले जातात. त्यानंतर सप्ताह यात्रा सुरू असताना गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या यात्रेच्या ठिकाणी प्रत्येक गावातून येणाऱ्या भक्तजन सेवेसाठी तत्पर असतात.

               यात्रेच्या पहिल्या दिवशी प्रवचने कीर्तन आरतीस सुरुवात होते. महाराजांसाठी सकाळचे फराळ दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण हे सर्व भाविक भक्तांसाठी उपलब्ध असते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी काकडा आरती विणेकरी विना घेऊन २४ तास उभे असतात. संत तुकाराम गाथा,वाचन ज्ञानेश्वरी वाचन पारायण त्यानंतर भजन गायन दुपारचे कीर्तन त्यानंतर दुपारच जेवण. विशेष म्हणजे भागवत कथा ऐकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तांची गर्दी असते. भागवत कथा सुटल्यानंतर हरिपाठ केला जातो. त्यानंतर संध्याकाळी जेवण करून कीर्तनासाठी भक्तजन तयार असतात. पाच दिवस संध्याकाळी कीर्तन, पाच दिवस दररोज देहू, आळंदी व पैठण या ठिकाणचे महाराज कीर्तनासाठी येत असतात. दुपारच्या वेळी नियमित भागवत कथा श्रवण करण्यासाठीही भक्तजनांची खूप गर्दी असते. भागवत कथा ऐकण्यासाठी तरुण जेष्ठ नागरिक महिला ऐकण्यासाठी येत असतात.                                                  


          पहाटे काकड आरती. त्यानंतर ज्ञानेश्वरी गाथा पारायण. त्यानंतर फराळ , अभंग त्यानंतर दुपारचे जेवण आणि भागवत कथेला सुरुवात होते. भागवत कथा संपल्यानंतर हरिपाठ केला जातो. हरिपाठ झाल्याच्या नंतर संध्याकाळची जेवण असते. सकाळचे जेवण झाल्यानंतर कीर्तन सुरू होते.  

                धोंडा महाराज देगलूरकर यांचे नातू गुरुराज महाराज देगलूर यांचेही कीर्तन असते.शेवटचे दोन दिवस गाथेची पूजा आणि काला काल्याचे किर्तन. निवृत्ती महाराज रावीकर यांचे दरवर्षीप्रमाणे ठरलेलेच असते. या दिवशी कॅबिनेट मंत्री कर्नाटक राज्य श्री प्रभुजी चव्हाण साहेब यांचे कडून भाविक भक्तांसाठी महाप्रसाद असतो. यात्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मनोरंजनाची साधने आकाशी पाळणे, जम्पिंग, टॉम ब्रेक डान्स, घोडे सवारी सुधा असते. 

         


  आजूबाजूच्या खेड्यातील लोक हे यात्रेमध्ये नारळाचे दुकान, पूजेचे साहित्य, पेढे वाल्यांचे दुकान, फळ विक्रेते, महिलांचे शुभेच्छा वस्तू, लहान मुलांचे खेळणी, देवी-देवताचे फोटो, लॉटरी ,फुलहार छोटी दुकाने  यात्रेमध्ये वस्तू विकत असतात. यात्रेमध्ये वावरत असताना सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सात दिवस कसे निघून गेले ते काहीच समजत नाही. 

यात्रेची वैशिष्ट्ये

               गावाची लक्ष वेधणारी  गोष्ट म्हणजे संत तुकाराम महाराज मंदिर हंगरगा( खुर्द) चौरस्ता फाटा या ठिकाणी भरणारी यात्रा यामध्ये जवळपास ११ गावांच्या लोकसंख्येचा समावेश असतो. त्यामध्ये हंगरगा (खुर्द), हंगरगा (बुद्रुक कर्नाटकराज्य) खतगाव, सावरमाळ, सावळी, बेनाळ, दावणगिरी, देगाव,  सावरगाव, शिळवणी, तुंबरपल्ली, या गावांमध्ये सुद्धा गाथा पारायण व ज्ञानेश्वरी सप्ताह असतो. परंतु हंगरगा खुर्द येथे संत तुकाराम महाराज मंदिर या ठिकाणी मोठी यात्रा भरते. 

            विशेषत: म्हणजे यात्रेच्या ठिकाणापासून चार किलोमीटर अंतरावर असणारे कर्नाटकातील हंगरगा बुद्रुक हे गाव या ठिकाणाहून सुद्धा जवळपास ८० टक्के लोक हे यात्रेसाठी हजर असतात. लोकांच्या मनात असलेले श्रद्धा भावना हे व्यक्त करण्यासाठी हे लोक तिथे हजर राहून यात्रेची शोभा वाढवतात. परिसरातील शहरात राहणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक वर्षीय यात्रेची आतुरता ओढ लागलेली असते. आणि प्रत्येक वर्षी यात्रेला शहरात असणारे व्यक्ती यात्रेसाठी हजर राहुन याची शोभा वाढवत असतात.


                             
                                          नाव : निळकंठ नामदेव सूर्यवंशी 

                                               वर्ग : एम.ए.द्वितीय वर्ष भूगोल 

                                                        २०२४-२५ 



ब्लॉग  समन्वयक   मार्गदर्शक  :     

                 डॉ.म.ई.तंगावार,प्रा.व्ही.जी.बिरादार,प्रा.जे.डी.संपाळे    

     

                             २०२४-२५

Comments

  1. निळकंठ सूर्यवंशी सात वर्षापासून आमच्या महाविद्यालयात शिकत असलेला अत्यंत गुणी व प्रामाणिक विद्यार्थी.महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागावर असलेल्या खेड्यातला हा मुलगा.या लेखाच्या माध्यमातून गाव व संस्कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल निळकंठचे मनःपूर्वक अभिनंदन!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऐतिहासिक खरोसा लेण्या

रवी बापटले यांचे एड्स ग्रस्तांसाठीचे सेवालय

Lucky : A Special Member of Our Family