आमच्या वासराचा वाढदिवस

                                                                       

                ३.     आमच्या वासराचा वाढदिवस                                                                
                                                          -  प्रीती काळोजी 

        वाढदिवस म्हटले की,लहान मुलाचा , मुलीचा किंवा मोठ्या माणसांचा , नेत्यांचा असेल असे वाटते, परंतु आमच्या घरी आम्ही आमच्या  गाईच्या वासराचा प्रथम वाढदिवस जंगी साजरा केला. आम्ही एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे शेतकरी कुटुंबात म्हटले की घरी सर्व प्राणी यांचा सहवास असणारचं.

          आमच्या घरी देखील ससा , कासव , कबूतर, निळकंठ राजा ,गाय ,बैल कुत्रा व म्हैस,

इत्यादी प्राण्यांचा सहवास असायचा. खूप दिवसांनी आमच्या घरी एके दिवशी माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राकडून एक गाय घेऊन आले. त्या गाईला पाहून आम्हाला खूप आनंद झाला. त्या गाईचे नाव आम्ही रंभा असे ठेवले.आमच्या घरी एक तर माझे वडील वारकरी संप्रदायातील असल्यामुळे घरामध्ये सर्वांना प्राण्याविषयी आवड होती. काही दिवसांनी आमच्या गाईला गोंडसं अस बाळ वासरू जन्माला आले.दिनांक १०/०१/ २०१८ या दिवशी गाईने वासराला जन्म दिला. आमच्या घरी पहिल्यांदा गाईने वासरू दिल्यामुळे आमच्या घरात आनंदाचे वातावरण होते. गाईचे वासरू इतके सुंदर होते की, सर्वांचे मन त्या वासराने जिंकून घेतले.

         जन्मलेल्या वासराचे नाव ठेवायचे असल्यामुळे वारकरी संप्रदायातील कीर्तनकार वडील असल्यामुळे वासराचे नाव पांडुरंगाचे नाव ठेवायाचे ठरले.त्यामुळे त्या वासराला 'विठ्ठल' असे नाव ठेवले. विठ्ठल हा २१ दिवसाचा झाला. वासराची आई रंभा ही आजारी पडली, 'तिव' या रोगामुळे  गाईचे दिनांक ३१/१/२०१८ रोजी  निधन झाले.पण तिच्या बाळाला म्हणजेच विठ्ठलाला गाईचे निधन झालेले देखील समजत नव्हते. वासरू आपल्या आईजवळ उड्या मारत मारत तिच्याजवळ येऊ लागला. आईचा दूध पिण्याचा प्रयत्न करू लागले.त्या वासराला आपली आई वारली आहे. याची कल्पना देखील नव्हती. त्यानंतर आम्ही एक जेसीबी बोलावून रिकाम्या प्लॉटमध्ये विधी केलो. त्याच ठिकाणी एक झाड लावलोत.

       आई नसल्याने 'विठ्ठल' हा सर्व कुटुंबाचा लाडका झाला. माझ्या कुटुंबातील सर्वजण त्या वासराला लेकराप्रमाणे सांभाळ करू लागले. त्याला दुधाची सवय असल्यामुळे त्याला कापसाच्या बोळ्याने दूध पाजू लागले. त्याला आवडत असलेले टरबुजाचे घर, पिठाचा गोळा असे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य त्या प्राण्याला देत असत. विठ्ठलाचे मित्र म्हणून आमच्या घरी काही कुत्रे होते. ती ही सर्वजण एकत्र येऊन एकमेकांशी प्रेमाने राहू लागले.

            आमच्या विठ्ठलाला दि.१०/०१/२०१९ रोजी एक वर्ष पूर्ण होणार म्हणून आम्ही सर्वजण विठ्ठलाच्या वाढदिवसाच्या तयारीला लागलो. आम्ही कुटुंबात आई सुरेखा,वडील संजय, बहीण श्वेता व भाऊ ओमकार इतके जण.माझ्या वडिलांनी वाढदिवसाच्या पत्रिका व बॅनर छापल्या.घरातील सर्वांनी विठ्ठलाच्या वाढदिवसासाठी जय्यत तयारी सुरू केली. अनेकांना पत्रिका वाटल्या. आमच्या घरी संगीत प्रेमी असल्यामुळे संगीत मैफिलीचा कार्यक्रम ठरला. बरेच मान्यवर मित्रपरिवार पाहुणे यांना आमंत्रित केले.जसे की एखाद्या मुलाचा वाढदिवस साजरा करावा तसे तयारीला सुरुवात झाली.

       वाढदिवसाचा  दिवस उजाडला. प्रश्न आमच्या आई-वडिलांना होता की, वाढदिवसासाठी केक हवा होता, परंतु वासराचा वाढदिवस असल्यामुळे त्याला काय आवडते तर टरबूज, ऊस, खवा, पिठाचा गोळा जामून,वाटाणा व शेंगा ई.याच्या साह्याने आम्ही विठ्ठलासाठी घरगुती त्याला आवडेल असा केक बनवला. वाढदिवसाची घाई सुरू झाली. मंडप आले, खुर्च्या आल्या, बॅनर अशी सर्व तयारी सुरू झाली. मुला मुलीला जसे नटवतात तसे वासराला धुणे, साबण लावणे त्याला सुंदर सजवणे हे काम प्रत्येक जण आपापल्या परीने करू लागले.वाढदिवसाची वेळ होती संध्याकाळी ०७.०० वाजता. स्वगृही काळोजी निवास हनुमान नगर उदगीर येथे.

       दुपारी ०४.०० वाजल्यापासून एका मुक्या प्राण्याचा वाढदिवस कसा साजरा करत आहोत हे  पाहण्यासाठी सर्व मित्र परिवार, पाहुणे ,लहान लेकरे, आमंत्रित सर्वजण जमायला सुरू झाले.पाच वाजता संगीत मैफिलचा कार्यक्रम सुरू झाला. स्वरानंद म्युझिकल ग्रूप यांच्या कार्यक्रमाने सुरुवात झाली. त्या ठिकाणी  जणू वासराचा वाढदिवस नव्हताच,अशी वातावरण निर्मिती झाली होती. परंतु त्या ठिकाणी लावलेले बॅनर सांगत होते. 'विठ्ठलाचा' वाढदिवस या ठिकाणी आहे. वाढदिवस म्हटले की,केक, नाष्टा व जिलेबी. आम्ही एका स्वयंपाकीला नाष्ट्याचे ऑर्डर दिली.

          वाढदिवसाची वेळ जवळ आली. सर्व मान्यवर व सर्वजण उपस्थित होते. लेकरांच्या मनात होती की, मुका प्राणी केक कसे कापणार. उपस्थित काही मान्यवरांचा आम्ही सत्कार केला.ज्याचा वाढदिवस आहे तो विठ्ठल हे सर्व पाहत होता. आमच्या परिवारातील काहींनी त्या वासराला फुलांचे माळ व आरती केली. आता केक कापावयाचा होता. विठ्ठलाला केक कापता येत नसल्यामुळे वासराचा केक माझ्या आजीच्या हाताने कापला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी देखील अनेक जणांची उपस्थिती लाभलेली होती.

          यानंतर सर्वांसाठी नाष्टाची सोय केली होती. सर्वांना चहापाणी आणि नाश्ता देण्यात आला. अशाप्रकारे सुरळीत ही व्यवस्था पार पडली. वाढदिवस हा लेकराचाच करत असतात म्हणून माहिती होते, परंतु आम्ही आमच्या विठ्ठलाचा मोठ्या उत्साहाने साजरा केला. यातून एकच आम्ही सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, मुक्या प्राण्यावरती दया करा. त्यांना विनाकारण मारहाण करू नका. आपल्या लेकराप्रमाणे मुक्या प्राण्यांचा सांभाळ करा .जवळपास २०० लोक हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या घरी आले होते. सर्वांनी वासराचे दर्शन घेऊन या कार्यक्रमाचे कौतुक केले.

                                                                         
                                                                                               -  प्रीती संजय काळोजी

                                                                                                    B.A.S.Y   २०२२-२३

: समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार,प्रा.व्ही.जी.बिरादार,प्रा.जे.डी.संपाळे                                                                                                         

Comments

  1. आपण केवळ हृदयस्पर्शी लेख लिहिला नाहीत,तर प्रत्यक्ष कृती केलात.त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!

    ReplyDelete
  2. Very heart touching 👏👏👌👌

    ReplyDelete

Post a Comment